विधिमंडळ वादाचा आखाडा?; मध्यरात्री मोठा राडा!, काय काय घडलं?

✨ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

गुरुवारी 17 जुलै विधिमंडळाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. गुरुवारी मध्यरात्री विधिमंडळाच्या गेटवर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांची गाडी अडवून ठिय्या घातला. यावेळी आव्हाड हे पोलिसांच्या गाडीखाली शिरल्याने पोलिसांना मोठी कसरत करत त्यांना बाहेर काढावे लागले.

मारहाण करणाऱ्यांना सोडून पोलिसांनी मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला अटक केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. विधान भवनाच्या गेटवर मध्यरात्री एक वाजता जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विधिमंडळाच्या लॉबीत गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली होती. आव्हाडांनी देशमुख या त्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे म्हणत टकले यांच्यावर मक्कोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

BJP and Rashtravadi

नितीन देशमुखला विधानभवनात याला मारहाण

आव्हाडांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत पोस्टही लिहिली आहे. पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुखला विधानभवनात याला मारहाण केली. यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले. शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे, असा आरोप त्यांनी पोलिसांवर केला आहे.

म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता, पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर! सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही! मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही! असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता.

Political News

आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य नाही; राज ठाकरे

एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला.

पडळकर-आव्हाड राड्याचे सभागृहात पडसाद

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून मोठी कारवाई:

  • भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी विधान भवनाच्या आवारात केलेल्या हाणामारीचे आज सभागृहात पडसाद उमटले. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून कारवाईची अपेक्षा होती. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी कारवाई केली आहे.
  • विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले अभ्यागत नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेले अभ्यागत सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा मलीन करणारे होते. त्यांच्याविरोधात चौकशी करून विशेषाधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
  • नार्वेकर म्हणाले, “जितेंद्र आव्हाड व गोपीचंद पडळकर या विधानसभा सदस्यांनी देशमुख व टकले या दोन अभ्यागतांना विधान भवनात आणले. त्यांच्या आक्षेपार्ह कृतीमुळे विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा सदस्यांनी सभागृहात याप्रकरणी खेद व्यक्त करावा. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची हमी द्यावी. त्याचबरोबर सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल याची काळजी घ्यावी. सभागृहाची प्रतिमा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही घडणार नाही अशी अपेक्षा मी सर्व सदस्यांकडून बाळगतो.”

अधिवेशन काळात अभ्यागतांना प्रवेश बंद

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळाच्या व सर्व सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. आता विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक आणि शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळेल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला. गुरुवारी विधिमंडळात मेन पोर्च इथे दोन सदस्यांच्या अभ्यागतांदरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेची चौकशी विधिमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात झाली असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे असंही अध्यक्षांनी स्पष्ट केलं. या अहवालानुसार विधीमंडळ ही कारवाई करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्षांनी यावेळी सर्व सदस्यांना विधान मंडळाच्या उच्च परंपरांचं पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली.

Dhruv

लेखन ही माझ्यासाठी केवळ अभिव्यक्ती नसून, विचारांना दिशा देणारी साधना आहे. समाजातील घडामोडी, संस्कृती, परंपरा, इतिहास आणि जीवनशैली यांचे निरीक्षण करून त्यातील प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक पैलू शब्दरूपात मांडणे हीच माझी ओढ आहे. साध्या बोलीभाषेत आणि सहज समजेल अशा शैलीत वाचकांसमोर कथा, लेख किंवा माहिती ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. वाचन, संशोधन आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची आवड यामुळे लेखन प्रवास अधिक समृद्ध होत आहे. माझ्या लिखाणातून वाचकांना केवळ माहितीच नाही, तर प्रेरणा, आनंद आणि विचारांची नवी दिशा मिळावी, हीच अपेक्षा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form